विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
१००० हून अधिक वर्षं टॉलेमीच्या जगाच्या कल्पनेचं वर्चस्व टिकून राहिलं. त्याचे तक्ते परिपूर्ण असंत आणि नकाशेसुद्धा अचूक असंत.
टोलेमीने त्याचे अल्मागेस्ट हे पुस्तक लिहिल्या नंतर विश्वाच्या कल्पनेस अधिक आधार मिळाला. त्याकाळी लोकप्रिय असलेल्या विश्वाच्या कल्पनांपैकी त्याची कल्पना सर्वाधिक वैशिष्टयपूर्ण ठरली. त्याच्या विश्वाच्या सिद्धांताचा पाया एवढा भक्कम होता की १५०० वर्षं तो टिकून राहिला. जेव्हा कोपर्निकसच्या कल्पनांनी आणि गॅलिलिओच्या निरीक्षणांनी टॉलेमी आणि ॲरिस्टोटलचं पृथ्वी केंद्रस्थानी असलेलं तत्व मोडून काढलं तेव्हा या सिद्धांताचा अंत झाला.
गॅलिलिओच्या संघर्षाचा आणि विज्ञानाच्या नवीन पर्वाच्या सुरुवातीचा आधुनिक मानवजातीवर एवढा प्रभाव पडला की त्यामुळे टोलेमीच्या विश्वाच्या कल्पनेचा ऱ्हास झाला. टॉलेमी आणि त्याच्या पूर्वीच्या तज्ज्ञांना जर न्याय द्यायचा असेल तर त्यांचे विश्वाबाबतचे सिद्धांत हे त्यांना ज्ञात असलेल्याच तथ्यांवर आधारित होते असे म्हणावे लागेल. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि स्थिर अशा पृथ्वीच्या कल्पनेस कदाचित काहीच धार्मिक आधारही नव्हता. ती कल्पना केवळ निरीक्षण आणि वैज्ञानिक युक्तिवादावर आधारलेली होती. पृथ्वी गोलाकार आहे हे ॲरिस्टोटल आणि टोलेमीला माहित होतं. त्यामुळे पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरते याची कल्पना करणं सोप्प होतं. ॲरिस्टोटलने या शक्यतेचा विचार केला आणि निरीक्षणांच्या आधारावर या कल्पनेचा धिक्कारही केला. त्याने असे प्रतिपादन केले की जर पृथ्वी फिरत असेल तर तिच्या पृष्ठभागावर एकाच दिशेने मोठ्या प्रमाणात वारे वाहायला हवेत. ज्याअर्थी असे वारे निरीक्षणास येत नाहीत त्या अर्थी पृथ्वी फिरू शकत नाही. अशाच प्रकारचे युक्तिवाद (पॅरॅलॅक्सचे / वस्तूस्थलभेदाचे युक्तिवाद) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाबाबतही मांडले गेले आहेत.
टॉलेमी हा भूगोलाचासुद्धा तज्ञ होता. त्याच्या पंचांग आणि भौगोलिक नकाशांसंबंधीच्या कल्पनांचा सतत वापर होत गेला आणि या कल्पनांनी तार्किकवादाच्या युगात पोहोचेस्तव मानवजातीस भरीव योगदान दिले.